पुणे: पुणे महापालिकेमध्ये काल(बुधवारी, ता, 6) माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात शाब्दिक चकमक होऊन जोरदार वाद झाला. किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मी तुला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवीन अशी धमकी दिली. त्यावर मी घरात घुसून मारेन अशी संतप्त प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली. या घटनेला आता मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आयुक्त नवल किशोर राम यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर आज किशोर शिंदे यांनी काल नेमकं काय घडलं आणि त्यांच्यात आणि आयुक्तांच्यामध्ये काय बोलणं झालं याबाबतची माहिती सांगितली आहे.

Continues below advertisement

कालच्या घटनेबाबत बोलताना किशोर शिंदे म्हणाले, महापालिका आयुक्त यांच्या घरी चोरी झाली आहे, माजी आयुक्तांच्या घरातील गोष्टी चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्या संदर्भात चौकशी करावी, असं एक पत्र आम्ही लिहिलं, नगरसेवक भेटीसाठीची वेळ न घेता आयुक्तांना भेटतात, त्यानुसार आम्ही निवेदनासाठी गेलो त्यांची बैठक सुरू होती. आयुक्त एकदम माझ्यावर भडकले, निघून जा आणि बाहेर जाऊन बस असं मला आयुक्त म्हणाले, त्यांची चिडचिड झाली. मी घरात घुसून तुला मारेल, तुला माहिती आहे का? मी कोण आहे असं आयुक्त मला म्हणाले. कोरोना काळात हे आयुक्त खूप चांगले होते हे आम्हाला माहिती होते, असंही पुढे किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे. 

तर तुम्ही मराठी संस्कृती बिघडवत आहेत असं आयुक्त आम्हाला म्हणाले. तुला पैशाचा माज आहे का? तू मनसेचा गुंड आहेस अशी भाषा त्यांनी वापरली. केबिनमधील सीसीटिव्ही दाखवा, यूपी, बिहारची भाषा ते बोलत आहेत. पोलिसांनी 353 चा गुन्हा दाखल केला आहे, मराठी माणसाला चीड येईल, जशास तसे उत्तर मिळेल. पालिका आयुक्त यांच्या बंगल्यातील चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे, आम्ही आज हेच निवेदन आयुक्त यांना देतो आहेत. चोरी कोणी केली हे सीसीटिव्हीमध्ये कळेल, राजेंद्र भोसलेंच्या कळत- नकळत हे समान नेलं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही किशोर शिंदे यांनी केली आहे. 

Continues below advertisement

मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातील लाखो रूपयांच्या वस्तू गायब

पुण्याच्या मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातील लाखो रूपयांच्या वस्तू गायब झाल्याची चर्चा आहे. पुण्याचे माजी आयुक्त राजेंद्र भोसलेंनी पदभार सोडल्यावर आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्याचं पाहणीत आढळून आलं आहे. राजेंद्र भोसले हे 31 मे रोजी महापालिका आयुक्त म्हणून निवृत्त झाले. मात्र त्यानंतर देखील त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न आहे असं कारण देत हा बंगला पुढचा एक महिना त्यांच्याकडेच ठेवला होता. नवल किशोर राम यांनी भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या शासकिय निवासस्थानात अनेक गोष्टी नव्याने बसवण्याची वेळ महापालिकेच्या अभियंत्यांवर आली आहे. त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची वेळ महापालकिकेवर आली. नवलकिशोर राम यांना याबाबत विचारले असता आपण येण्याआधी या बंगल्यात कोणत्या वस्तु होत्या, याबद्दल आपल्याला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र काही वस्तु नव्याने बसव्याव्या लागल्याच त्यांनी मान्य केलं आहे.