पुणे : पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime News) केली आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (23, मूळ रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातमध्ये राहत होती. मंगळवारी रात्री वसतिगृहामधील तिच्या खोलीसमोर अभ्यासासाठी असलेल्या एका मोकळ्या खोलीत तिने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही बाब लक्षात येताच तिच्या मैत्रिणींनी आणि रहिवासी कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ज्योतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली असून, तिने नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय. बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ज्योतीने दुपारीच मैत्रिणींना पार्टी दिली ; जेवण केलं, केक कापला....
टोकाचं राऊल उचलण्याआधी ज्योतीने तिच्या सर्व मैत्रिणींना पार्टी दिली. एकत्र जेवण केलं, केक देखील कापला आणि गळाभेट घेतली. त्यानंतर दुपारच्या सुमारास 4.30 वाजता तिने आईसोबत व्हॉटस्अॅप स्टेटसही ठेवले. सायंकाळी 6.30 नंतर ती कोणालाही दिसली नाही. मैत्रिणी तिला शोधू लागल्या, शोधाशोध केल्यानंतर ती अभ्यासासाठी राखीव असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हे पाहून तिच्या मैत्रिणीला मोठा धक्का बसला आणि पॅनिक अटॅक आला.
आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत...
आत्महत्येपूर्वी ज्योतीने लिहून ठेवलेल्या चिठ्ठी सापडली आहे मला शिकायचे आहे. पण, माझ्याकडून ते होत नाही. मला माफ करा, असे तिने लिहले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता, 5) संध्याकाळी नेहमीप्रमाणे तिने मैत्रिणींशी गप्पा मारल्या. मैत्रिणींसोबत ती जवळच्या मंदिरातही जाऊन आली. अभ्यासात हुशार असलेल्या ज्योतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमध्ये काय?
मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाहीये, मला माफ करा, असं म्हणत तिने आई-वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तिचा भाऊ राजस्थान येथून थोड्या वेळापूर्वीच पुणे शहरात दाखल झाला आहे. दरम्यान, मृत तरूणीची मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. तिच्या काही औषध-गोळ्या देखील सुरु होत्या. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. काही दिवसांपूर्वी तिने टक्कलही केल्याची माहिती समोर आली आहे.