पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. पुण्यातील भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण उपचार मिळण्यास उशीर झाल्याने प्रसूतीदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तनिषा भिसे यांना प्रसूतीकळा सुरु झाल्याने त्यांना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांची परिस्थिती वाईट झाल्याचं सांगत त्यांनी लगेचच पैसे भरायला सांगितलं. प्रसूती किचकट असल्याने दोन बाळांचे 20 लाख रूपये उपचारांसाठी भरावे लागतील असं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं. सुशांत भिसे यांनी विनंती केल्यानंतर 20 पैकी 10 लाख आता भरावे लागतील, असं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं. कुटुबांने 3 लाख भरण्याची तयारी दाखवली पण रुग्णालय प्रशासन 10 लाख रूपये भरा यावरती ठाम होतं. जवळपास भिसे परिवाराच्या घरी आठ वर्षांनी गुड न्यूज आली पण नियतीने आणि रूग्णालयाच्या निर्णयाने सगळ्यावरती विरजण पडलं.
आठ वर्षांपूर्वी तनिषा-सुशांतचा विवाह
सुशांत भिसे आणि तनिषा भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षांपुर्वी झाला होता. दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. तनिषा या पूर्वी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं. यादरम्यान, सुशांत यांना प्रशासकीय विभागामध्ये नोकरी लागली. प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर अगदी योग्यरितीने त्यांच्या सुखी संसार सुरू होता. दरम्यान, सुशांत भिसे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रियपणे सहभाग घेतला. परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुशांत यांना आरोग्यदूत हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण नियतीच्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा-सुशांतला लाभलं नाही.
आठ वर्षांनी घरात पाळणा हलणार होता
तब्बल आठ वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. आठ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आई-बाबा म्हणणारे आणि घरभर फिरणारी चिमुकली पावलं येणार होती. दोघेही खूप खुश होते. अशातच तनिषा या एक नाही तर दोन बाळांना जन्म देणार होत्या, त्यामुळे त्यांचा आनंद देखील मोठा होता पण त्या आनंदावर असं विरजण पडलं.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.