सर्वांच्या कल्याणासाठी जातीव्यवस्था टिकावी मात्र आरक्षण संपवावे असे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी शंकराचार्य यांनी म्हटले. चुकीच्या वापरांमुळे जातीव्यवस्था वाईट ठरली असा दावा त्यांनी केला. शंकराचार्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. 


श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डीएम फाउंडेशनतर्फे पुण्यात आयोजित सप्ताहाचे व व्याख्यानमालेचे उद्घाटन शंकराचार्य यांच्या हस्ते झाले. यावेळी 'जात असावी की नसावी' या व्याख्यानमालेत बोलताना शंकराचार्यांनी धर्मशास्त्र, जातीव्यवस्था, समाजातील अनिष्ट चालीरीती यावर त्यांची मत मांडली. त्यांनी म्हटले की, जातीव्यवस्था सर्वांच्या कल्याणासाठी आहे. मात्र, अनेकांनी स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने जातिव्यवस्थेचा वापर केला. त्यामुळे धर्मशास्त्र आणि समाजव्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेली जातीव्यवस्था वाईट ठरली. मानवाच्या कल्याणासाठी जातीव्यवस्था टिकवणे आणि योग्य पद्धतीने त्याचे अनुकरण करणे समाज व देशहिताचे आहे," असे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी म्हटले.
 
टिळक मार्गावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, पत्रकार दत्ता जाधव, फाउंडेशनचे विजय देशभुख महाराज यांनी देखील विचार मांडले. या प्रसंगी 
शंकराचार्य म्हणाले, "समाज सुशिक्षित होतोय; मात्र सुसंस्कृतपणा विसरत चालला आहे. सनातन वैदिक संस्कृतीने मानवाच्या कल्याणासाठी जातीव्यवस्थेचे महत्व अधोरेखित केले आहे. धर्मशास्त्राचे पालन न केल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आपण हक्क मागतो; पण कर्तव्य सोयीस्कर विसरतो. जात घालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती अधिक प्रभावी होत जाते. जातिव्यवस्थेचे कवच असल्यानेच ब्रिटिशांना धर्म फोडता आला नाही. आरक्षण व्यवस्था सर्वांसाठी घातक आहे. समाजाची घडी चांगली राहण्यासाठी जातिव्यवस्था टिकवली पाहिजे असं त्यांनी म्हटले. 


आनंद दवे म्हणाले, "गेल्या सहा महिन्यात जातीय वातावरण अधिक गडद झाले. जातीचा उपयोग करून राजकारण्यांनी समाजाची केलेली विभागणी लोकशाहीला मारक आहे. आरक्षणाला विरोध करणारे मनोज जरांगे आज आरक्षणासाठी आरपारची लढाई करत आहेत. सध्याच्या भूमिकेने भविष्यात मराठा अस्तित्वात राहिल की नाही, याची शंका वाटते. गुणवत्तेला आरक्षणाचा पर्याय अयोग्य असून, जात घालवण्यासाठी आरक्षण रद्द केले पाहिजे अशी मागणी दवे यांनी केली. जातीच्या भांडणात धर्माचे मोठे नुकसान होते. हिंदू धर्माच्या नावावर एकत्रित आलेला समाज फोडण्याचे काम जातीयवादी लोक करतात, हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


दत्ता जाधव म्हणाले, "जात नसावी, असे आपण म्हणतो. मात्र, स्वार्थासाठी जातीचे अस्त्र वापरतो. राजकीय नेत्यांनी जातीच्या उतरंडी अधिक मजबूत केल्या आहेत. शिक्षणामुळे जातीच्या चौकटी दूर व्हायला हव्या; मात्र राजकीय गणिते जुळवण्यासाठी जातीचे समीकरण केले जाते. त्यातून जात अधिक स्पष्टपणे पुढे येते. गेल्या काही काळात जाती-जातीतील रेषा अधिक ठळक होत आहेत."


विजय देशमुख महाराज म्हणाले, "जातीअंताचा लढा अनेक वर्षांपासून सुरु आहे. जात संपवण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. माणूस म्हणून जगण्याची आणि समाजाला एकसंध ठेवण्याची गरज असताना जातीच्या नावावर होणार अवडंबर अयोग्य आहे. जात नसावी, यासाठी काम करायला हवे. देशमुख महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून मानवता धर्म जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी म्हटले.