Pune News : तुम्ही पुण्यातून (Pune) रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवाशांना विमानातळाप्रमाणेच (Airport) रेल्वे स्टेशनवरही (Railway Station) एक तास आधी पोहोचावं लागणार आहे. नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी एक तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचावं, असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चेन ओढण्याचं (Chain Pulling) प्रमाण वाढल्यामुळे ही बाब सांगण्यात आल्याचं कळतं.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यास उशीर
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. या कोंडीमुळे प्रवासी रेल्वेच्या वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी काही प्रवाशांचे नातेवाईक जाणूनबुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. रेल्वेच्या चेन खेचण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. या गोष्टीचं गांभीर्य ओळखून हे प्रकार कमी करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या एक तास आधी स्टेशनवर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चेन खेचण्याच्या 1164 घटना, 914 प्रवाशांना अटक
जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेमधील चेन खेचण्याच्या 1164 घटना घडलेल्या आहेत. यात 914 प्रवाशांना अटक देखील करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यात तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. त्यामुळे चेन खेचून दंड भरण्याची वेळ ओढवून घ्यायची नसेल तर प्रवाशांनी एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहचण्याच्या सूचना प्रशासनाने केलेल्या आहेत.
वेळ आणि अंतराचं कॅल्क्युलेशन करुन ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पोहोचा : पुणे रेल्वे विभाग
"पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर, विशेषतः संध्याकाळच्या वेळी परिणाम झाला आहे. नातेवाईक आणि मित्र ट्रॅफिकमध्ये अडकल्याने आणि वेळेत स्थानकावर पोहोचू न शकल्याने प्रवासी चेन खेचतात. त्यामुळे प्रवाशांना आमचं आवाहन आहे की, पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी त्यांच्या संबंधित स्थानावरुन वेळ आणि अंतराचं कॅल्क्युलेशन करावं आणि ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान एक तास आधी पोहोचावं, असं पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झंवर यांनी म्हटलं.
संध्याकाळच्या वेळी चेन ओढण्याच्या घटना सर्वाधिक
पुणे शहरात गेल्या दिवसांपासून संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गोरखपूर, इंदूर, कोलकाता, जम्मू यासारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून संध्याकाळी सुटतात. यामुळे काही प्रवाशांची ट्रेन निघून जाते आणि बहुतांश चेन खेचण्याचे प्रकार संध्याकाळच्या वेळीच घडतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे व्यवस्थापनाकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.
VIDEO : Pune : पुण्यात लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी प्रवाशांना स्टेशनवर पोहोचावं लागणार