Pune Crime : रुग्णांवर उपचार नीट न झाल्याने रुग्णाच्या नातेवाईंकानी डॉक्टरला मारहाण केल्याच्या अनेक घटना आपण यापूर्वी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण आवडतं पाळीव मांजर (Pet Cat) उपचार नीट न केल्यामुळे मृत्यू पावल्याने व्हेट्रनरी डॉक्टरला (Veterinary Doctor) मारहाण झाल्याची घटना पुण्यातील (Pune) हडपसरमध्ये (Hadapsar) घडली आहे. डॉ. रामनाथ ढगे असं डॉक्टरचं नाव असून या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात एक महिला आणि चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत डॉक्टर ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे.


आरोपी महिलेचं मांजर (Cat) दोन दिवसांपासून काही खात नव्हतं. त्यामुळे ती महिला मांजर डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन आली होती. मात्र तिथे काही उपचार करण्यापूर्वीच मांजर दगावल्याचं डॅाक्टर रामनाथ ढगे यांनी महिलेला सांगितलं. यानंतर या महिलेने तिच्या पती आणि मुलांना क्लिनिकमध्ये बोलावून घेतलं आणि डॉक्टरला जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. "मांजर झोपलं आता तुला झोपवतो," अशी धमकी देत या डॉक्टरला मारहाण करण्यात आली. डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या विरोधात व्हेट्रनरी डॉक्टर असोसिएशन आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.


डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर


ही घटना 10 डिसेंबरची आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या मारहाणीत डॉक्टर ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांना खासजी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मारहाणीनंतर आरोपी पसार झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ही संपूर्ण घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  


घरात मांजर पाळण्यासाठी पुण्यात महापालिकेची परवानगी आवश्यक


घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा (Pune Muncipal Corporation) परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना (Pets) घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करुन त्यासाठी रितसर परवानगी घेणं बंधनकारक आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला 50 रुपये इतके शुल्क भरावं लागणार आहे. तसंच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसंच दरवर्षी त्या परवान्याचे नुतनीकरण करुन 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.