पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या (Pune News) सातत्याने वाढत आहे. हिच वाढती लोकसंख्या आणि पुण्याच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCMDevendra Fadanvis) मोठं विधान केलं आहे. 'शहराची लोकसंख्या वाढत आहे, त्यासोबतच शहरीकरणदेखील वाढत आहे.पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. हे सगळं लक्षात घेऊनच शहराचा विकास करा', असं ते म्हणाले आहेत. 


पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला.


शहरातील पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या!


एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल.  सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.


शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल!


पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे.  शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्वाचा असल्याने बचत गटांना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल.  शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी-


VIDEO : गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका