पिंपरी-चिंचवड, पुणे :
रावण राक्षस होता (Ravan) तर मग सीतेच्या स्वयंवरला  त्याला आमंत्रण का दिलं होतं? रावण ब्राम्हण होता तर मग त्याची बहीण राक्षसी कशी काय? लोकांना वेड्यात काढणं सोपं आहे. मात्र त्यांना हे समजावणे कठीण आहे. की तुम्हाला मूर्ख बनवलं जातंय, अशा आशयाचे स्टेटस ठेवून सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये एकावर  (Pune Crime news) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राहुल वाघमारे (55 वर्ष) असं स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. एका शाळेत लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी सात फेब्रुवारीच्या सकाळी हे स्टेटस ठेवले होते. तर दुसऱ्या स्टेट्समध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चेहऱ्याच्या जागी दुसऱ्याचे चेहरे वापरून आक्षेपार्ह फोटो ठेवला होता. त्यांच्या या कृतीने फिर्यादी धनंजय गावडे यांसह समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रामसंदर्भात आक्षेपार्ह संवाद


पुण्यात असे प्रकार सातत्याने पुढे येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात राम आणि सीता हे पात्र घेत नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. त्यात राम आणि सीता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह संवाद होते. या संवादावर विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडलं होतं. त्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. दोन्ही गटात हाणामारी झाली होती. या नाटकात दाखवण्यात आलेल्या रामाच्या पात्रावर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांत धाव घेत हिंदूंच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीवरुन विभागप्रमुखासह सहा जणांना अटक केली होती. 


सोशल मीडियावरुन स्टेटस ठेवताना सावधान!


राम मंदिराचं लोकार्पण झाल्यापासून अनेक लोक राम आणि सीता यांच्यासंदर्भात वेगवेगळे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा प्रकारचे स्टेटस पोस्ट करणं आता अनेकांना महागात पडल्याचं दिसत आहे. चंद्रपूर जवळील भद्रावती तालुक्यातदेखील असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी हिंदू संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती शिवाय हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिळून सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल करण्यांना मारहाणदेखील केली होती. त्यामुळे आता प्रत्येकाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवताना सावधानता बाळगायला हवी नाहीतर पोलीस ठाण्याच्या वाऱ्या कराव्या लागू शकतात.



इतर महत्वाची बातमी-


MNS Vasant More : "आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत'; स्टेटसमुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत; मनसेत इच्छुकांची गर्दी वाढली?