पुणे : पुणे पोलिसांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून सज्जड (Pune Crime news) दम दिला मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला "भाई लोकांच्या" कार्यकर्त्यांची केराची टोपली दाखवली आहे.  पुणे पोलिसांचे आदेश गुंडांनी डावलल्याचं पाहायला मिळालं. गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचं दिसून आलं.  सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत (reels On social media) पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स व्हायरल करण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. 


गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत, अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले आहे.


कोण आहे निलेश घायवळ?


निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिलं. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली.कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.


निलेश घायवळ सध्या काय करतोय?



सध्या निलेश घायवळ हा त्याचं मूळ गाव असलेल्या जामखेड तालुक्यात राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून तो आमदार संतोष बांगर यांच्या संपर्कात आला आणि त्याच्या मार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला. या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अनेक विरोधीपक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात आली. 


पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली


पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सगळ्या गुन्हेगारांना धारेवर धरलं आहे त्यासोबत उपायुक्तांनी देखील गुन्हेगारांना तंबी दिली आहे. पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढण्यात येत आहे. यावेळी गुन्हेगारांना सज्जड दम दिला जात आहे.  गुन्हेगारीचे स्टेटस ठेवायचे नाहीत, रिल्स टाकायचे नाही टाकले तर याद राखा, अशा शब्दात गुन्हेगारांना सज्जड दम दिला जात आहे. तरीही गुन्हेगारांकडून रिल्स व्हायरल करण्यात येत आहे. 


 इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : रोहित पवारांचा अंगरक्षक असल्याचं सांगत थेट पिस्तूल काढली; पुण्यात नेमकं काय घडलं?