पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी (street dog) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे तर काहींना यात जीवदेखील गमवावा लागला आहे. या कुत्र्यांविरोधात आता पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. कुत्र्याचा बंंदोबस्त करा नाही तर राजीनामा द्या, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.


पत्रात नेमकं काय लिहिलंय?


पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे प्रवक्ता माधव पाटील यांनी हे पत्र ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की,  पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्क येथे आहे. पण या भागातील लोकच सुरक्षित नाहीत. या भागात अनेक भटके कुत्रे आहेत आणि त्यांची दहशत इतकी आहे की जेष्ठ नागरिक, लहान मुलेच काय कोणीही एकटे सकाळी 7 वाजता घराबाहेर पडू शकत नाहीत, रनिंगला जाऊ शकत नाहीत किंवा काही आणायला दुकानात जाऊ शकत नाहीत. सकाळी प्रेमलोक पार्कचे रस्ते या कुत्र्यांमुळे ओसाड असतात. ही कुत्री झुंडीने माणसांवर हल्ला करतात आणि चावतातही. या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो. ( 'वाघ बकरी चहा'चे मालक कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले ). 


आपला माणूस हा अनमोल असतो. वारंवार तक्रारी करून देखील यावर कारवाई शून्य. पालिकेच्या या शून्य कारवाईमुळे किंवा कारवाई केली या दिखाव्यामुळे कदाचित कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा प्राण जाऊ शकतो. पालिकेच्या वार्षिक 5000 कोटी बजेटमधून भटक्या कुत्र्यांसाठी 100 एकरात कुत्रालय उभारा पण आम्हाला आमच्या परिसराचा आनंद घेउ द्या. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना घरात बसवून, महानगरपालिकने नागरिकांना गुलामाची वागवणूक देऊ नका. तुम्ही जर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील लोकांचे संरक्षण करणार नसाल तर काय उपयोग त्या आयुक्तालयाचा आणि पालिकेचा ? माझे तुम्हाला आवाहन आहे कि हि कुत्र्यांची दहशत एकदा अनुभवा आणि सकाळी ७ वाजता प्रेमलोक पार्कमध्ये रनिंग करून दाखवा. माझी नम्र विनंती आहे कि या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा राजीनामा द्या.या कुत्र्यांचे हल्ले मी स्वतः पहिले आहेत, अनुभवले आहेत, अनेकांनी याबाबत माझ्याकडे बातचीत केली आहे. आपण माझी भावना समजून घ्याल हि अपेक्षा!


इतर महत्वाची बातमी-


Kohli ODI Century : सचिनला अभिवादन, अनुष्काला फ्लाईंग किस, शतकाच्या अर्धशतकानंतर कोहलीचे विराट सेलिब्रेशन