पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला विभागाच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याबद्दल भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भस्मराज तिकोणे (राहाणार कसबा पेठ), प्रमोद कोंढरे (राहणार नातू बाग) आणि मयुर गांधी (राहणार शुक्रवार पेठ) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कलम 354, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल (16 मे) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वैशाली नागवडे आणि त्यांच्या सहकारी महिलांकडून बालगंधर्व रंगमंदिरात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि विनयभंग झाल्याचा वैशाली नागवडे यांनी आरोप केल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

"शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील बालगंधर्व येथील कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. महागाईविरोधात आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन महिला कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी गनिमी काव्याने गेल्या होत्या, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत सभागृहाबाहेर लोटलं. दरम्यान दुसरीकडे स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्या हॉटेलबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत थेट हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्नइराणी यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी यावेळी केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखलं, यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याचं देखील दिसून आलं. यानंतर  काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

संबंधित बातम्या

Pune News : पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी भाजप आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Smruti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर; महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध, चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न