Pune News Kidney Racket : पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.  एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.  


सारिका सुतार या महिलेने तिची फसवणूक करून तिची किडनी काढल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलीसांना सारिका सुतार या महिलेची 15 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले.  


त्यासाठी सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रं तयार करण्यात आली. मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे 15 लाख न देता चार लाखांवर त्यांची बोळवण करण्यात आली आणि म्हणून त्यांनी तक्रार दिल्याचे पोलीसांना चौकशीत आढळून आलं. ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं. त्यानंतर पोलीसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला.


पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी  हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.