पुणे : वर्षानुवर्षे कोणताही व्यवहार होत नसलेल्या निष्क्रीय बॅंक खात्यांची माहिती चोरुन त्या आधारे ऑनलाईन दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलीसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आठ आरोपींमधे प्रसिद्ध मराठी अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकनीचा समावेश आहे. 


रोहन मंकणी हे भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष देखील आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये खाजगी न्यूज चॅनल चालवणाऱ्या एकाचाही अटक आरोपींमध्ये समावेश आहे.  वेगवेगळ्या बॅंकांमधील डोरमंट अकांउट म्हणजे जी बॅंक खाती नावाला अस्तित्वात असून वर्षानुवर्ष त्या अकांऊटमधून कोणतेही व्यवहार होत नाहीत अशा बॅंक खात्यांची माहिती या टोळीकडून हॅकिंगच्या सहाय्याने मिळवण्यात आली होती. त्याचबरोबर काही वापरात असलेल्या बॅंक खात्यांची माहिती देखील या टोळीने मिळवली होती. या सर्व बॅंक खात्यांमध्ये मिळून 216 कोटी 29 लाख रुपये होते. या खात्यांची माहिती ही टोळी एकाला विक्री करणार होती. त्यानंतर त्या निष्क्रिय खात्यांमधील पैसै इतर खात्यांवर वळते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.


सायबर पोलिसांना खबऱ्यामार्फत  माहिती मिळाली की यातील आरोपी चोरलेला हा डाटा विकण्यासाठी पुण्यातील महर्षी नगर भागात येणार आहेत. सायबर पोलिसांनी मग महर्षी नगर भागातील नयनतारा हाईटस या इमारतीत  सापळा रचला. काही वेळात नारंगी रंगाच्या कारमधून रोहित मंकणी तिथे आला. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे आणखी पाच पुरुष आणि एक महिला पोहचली. पोलिसांनी या सहाही जणांना अटक केली असता ते चोरलेला हा डाटा सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन याला विकणार असल्याचं सांगितलं. या अटक आरोपींना घेऊन पोलिस सिंहगड रस्ता परिसरातील त्या सोसायटीत पोहचले असता तिथं त्यांना सुधीर भटेवरा देखील मिळाला. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून गुजरातहून पैसै नेण्यासाठी मुंबईत आलेल्या आणखी दोघांना मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. 


अटक केलेल्या आरोपींकडे आय सी आय सी आय, एच डी एफ सी आणि इतर बॅकांमधील डॉरमंट खात्यांची माहिती मिळालीय. अटक केलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे आय टी इंजिनीअर आहेत. तर औरंगाबादमधे खाजगी न्यूज चॅनल चालवणाऱ्यांचाही अटक आरोपींमधे समावेश आहे.  रोहन रवींद्र मंकणी (वय 37, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय 54, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय 34, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय 34, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय 37, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय 34, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय 45, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय 42, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय 40, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.