पुणे : ललित पाटील (Lalit Patil)  प्रकरणात पदमुक्त करण्यात आलेले ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur)  यांच्या मुलाने  राजीनामा दिला आहे. डॉ. अमेय ठाकूर (Dr. Amey Thakur)  असे मुलाचे नाव असून ते  बी जे मेडिकल कॉलेजमध्ये (B J Medical College)  प्राध्यपक म्हणूक कार्यरत होते. त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण समोर न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  


डॉक्टर संजीव ठाकूर पुण्यात ससून रुग्णालयाचे डीन म्हणून रुजू झाल्यानंतर डॉक्टर अमेय ठाकूर हे बी जे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी डॉक्टर संजीव ठाकूर सोलापूरला शासकीय रुग्णालयात डीन म्हणून असताना डॉक्टर अमेय ठाकूर तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ज्याला सोलापुरातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. डॉक्टर अमेय ठाकूर यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती त्यांचे वडील डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या प्रभावातून झाल्याचा आरोप होत होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.


ठाकूर  पितापुत्रांसाठी  रुग्णालयात विशेष सेवा


ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि मुलगा डा. अमेय ठाकूर या पितापुत्रांसाठी  रुग्णालयात विशेष सेवा असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. ठाकूर पितापुत्रांन शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर देण्यात आले होते. हे ऑपरेशन थिएटर फक्त ठाकूर पितापुत्र वापरत होते. दुसऱ्या डॉक्टरांना हे ऑपरेशन थिएटर वापरण्याची परवानगी नव्हती. हे दुसऱ्या डॉक्टरांना देण्यात आले त्यावर  चावी देणाऱ्या कर्मचाऱ्याला मेमो देत समज देण्यात आली होती. 


ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी


ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आलं आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते. त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून संजीव ठाकूर हे नाव चांगलंच चर्चेत होते. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.