पुणे : पुण्यातील FTII मधील वादग्रस्त बॅनर प्रकरणी दोन्ही गटातील प्रमुख सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना तेथील काही विद्यार्थ्यांनी (Babri) बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पस मध्ये लावला होता. यावरुन काही तरुणांनी FTII च्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. दोन गटांमध्ये बाचाबाची झाली होती. हा वाद थेट पोलिसांत पोहचला आणि पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. FTI संस्थेतील विद्यार्थ्यांवर आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या तरुणांवर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 


काय आहे  प्रकरण? 


फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय)अर्थात पुण्यातील FTII या संस्थेत "रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन" अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. काल दुपारी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये  (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. FTII मधील विद्यार्थी संघटनांकडून बॅनर झळकवण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. 


FTII कडून तक्रार


या प्रकरणी FTII ने डेक्कन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि असा कोणताही प्रकार घडू नये, म्हणून FTII संस्थेकडून पोलिससांना बंदोबस्त वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. FTII कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात आला.


FTII मध्ये आंदोलनांचं सत्र सुरुच


काही वर्षांपूर्वीदेखील FTII च्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. गजेंद्र चौहान यांच्यासह या FTII च्या संचालक मंडळावर नियुक्त करण्यात आलेले सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असून सिने-टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये त्यांचे फारसे योगदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यापेक्षा कॅम्पसचे भगवेकरण सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.  अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या मागे अतिडाव्या विचारांच्या संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता. 


इतर महत्वाची बातमी-


जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान