Pune NCP Protest News: पुण्याला (Pune) पालकमंत्री नसल्याने अनेकांची कामं खोळंबली आहे. शेतकरी (farmer), विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना कोणी वाली उरला नाही आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ आणि सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदोलन करण्याल आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. 


कोणी पालकमंत्री देता का? पालकमंत्री? असं म्हणत राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नटसम्राट चित्रपटासारखी पुण्याची परिस्थिती झाली आहे. त्यात कुणी घर देता का घर तशी परिस्थिती होती. इथे पालकमंत्री देता का पालकमंत्री अशी परिस्थिती आहे. सरकारमध्ये काय चाललंय. आमच्या पुणेकरांच्या वाट्याला कोणी वाली नाही का?  आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कुणी वाली नाही का? कुणी पालकमंत्री देता का पालकमंत्री? अशी परिस्थिती सध्या पुण्याची झाली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख  यांनी व्यक्त केलं.


सध्याच्या राजकारणामध्ये किंवा सत्तेत मग्न झालेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. राज्यात काय सुरु आहे?, याकडे या दोघांचंही लक्ष नाही आहे. दिल्ली वाऱ्याकरुन काहीही मिळणार नाही आहे.  89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यांना मदत करायची सोडून दोघंही त्यांचा फायदा बघत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे काय नुकसान होत आहे. हे नुकसान आम्ही जवळून बघत आहोत. त्यामुळे पुण्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती करा म्हणजे फार नुकसान होणार नाही, असं मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं.


पुणे जिल्ह्यात यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. तरीही या सरकारचं लक्ष दिल्लीकडे आहे. लवकरात लवकर पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.