पुणे: पर्वती येथील वाघजाई परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. संजय लवंगे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पुण्यातील लष्करामध्ये लान्स नायक म्हणून काम करत होते. त्यांची हत्या प्रतीक हाके आणि अमित सदनकर यांनी केल्याचं निष्पन्न झालं आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांशी संजय लवंगे यांची ओळख एका वाइन शॉपमध्ये झाली होती. दरम्यान, तिघेही वाघजाई टेकडीवर दारू पित बसले होते. त्यावेळी संजय यांचं एटीएम कार्ड खाली पडलं तेव्हा आरोपींनी एटीएमच्या पासवर्डसाठी तगादा लावला. मात्र, लवंगे यांनी पासवर्ड सांगितला नाही.
एटीएमचा पासवर्ड सांगत नसल्यानं दोन्ही आरोपींना त्याचाच राग आला. त्यानंतर प्रतीक आणि अमितने त्यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली आणि दगडाने मारहाण करुन लवंगे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दत्तवाडी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवताना हत्येचा छडाही लावला.