पुणे : पुण्यातील कोथरुड भागातील केळेवाडीमध्ये मागील आठवड्यात अकरा वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. या मुलाचा खून त्याच्या ओळखीतल्याच तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने केल्याचं उघड झालं आहे. खेळताना किरकोळ वादातून हा खून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
खुन करणारा 13 वर्षांचा मुलगा सातवीत शिकत असून तो स्वभावाने चिडखोर असल्याचं परिसरातील लोकांनी पोलिसांना सांगितलं. काही दिवसांपूर्वी किरकोळ वादातून त्याने शेजारच्यांचे कपडेही जाळून टाकले होते, अशी माहितीही पोलिसांना मिळाली.
केळेवाडी भागातील अकरा वर्षाच्या मुलगा शुक्रवारी () गायब झाला होता. खेळायला जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा संध्याकाळी परत न आल्याने, घरच्यांनी पोलिसांकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र रविवारी (31 जानेवारी) छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावरच दगडाखाली आढळून आला होता.
यानंतर पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी 13 वर्षीय मुलाला अटक केली. या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.