पुणे: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात(Pune) तरूणाई वेगळ्याच वाटेवर चालल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्यात चांगलं शिक्षण(Education) घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातून (Dr. Babasaheb Ambedkar Student Hostel) धक्कादायक बातमी समोर आली आहे. या वसतिगृहामध्ये (Hostel) राहणारे विद्यार्थी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्याने इतर शांत विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार शहरातील घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी पुणे महानगरपालिकेने घोले रोड येथ १०८ खोल्यांचे मोठे वसतिगृह बांधण्यात आलेले आहे. या वसतीगृहात ४०० जणांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. शहराच्या मध्य भागामध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो. मात्र त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शांततेत शिकता येत नसल्याचं दिसून येत आहे.
एका बाजूला विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय, जेवणासाठी पैसे दिले जात असताना दुसरीकडे वसतिगृहात दारू पिणे आणि बाकी गोष्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, तंबाखू यासारख्या गोष्टी सापडल्या आहेत. शिकण्यासाठी जिथे विद्यार्थी येतात तिथे हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाकडून १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.