पुणे : पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेनं बाजारात आणलेल्या कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडताना दिसत आहेत. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना 21 गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवली आहे. त्यापैकी 7.59 टक्के असा सर्वात कमी व्याजदर आकारणाऱ्या कंपनीनं पुढील 10 वर्षांसाठी हे कर्जरोखे खरेदी केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पहिल्याच दिवशी दोनशे कोटींची भर पडली आहे.
पुण्यामध्ये सर्वत्र 24 तास समान पाणीपुरवठा व्हावा यासाठीची योजना महापालिकेनं हाती घेतली आहे. त्यासाठी 2264 कोटी रुपये कर्जरोख्याच्या माध्यमातून उभारण्याचा धाडसी निर्णय महापालिकेनं घेतला आहे. विकासकामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जरोखे काढणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला असला, तरी शेअर बाजारात त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी पुणे महापालिकेचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान या कर्जरोख्यांची नोंदणी करण्यासाठी मुंबई शेअर बाजारात आज 22 जूनला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वेंकया नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनेक नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. परंतु पुण्यात विरोधी पक्षांचे नेते याला विरोध करत आहेत.