पुणे : शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे (Pune) शहराची औद्योगिक नगरी अशीही ओळख बनली असून येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, बिल्डर लॉबी, गुंठा मंत्री आणि रिअल इस्टेटमुळे पुणे जिल्ह्यात गुंडगिरी व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. येथील या व्यवसायामुळे आर्थिक व्यवहारातून टोळ्या निर्माण होतानाचे चित्र देखील यापूर्वी दिसून आले आहे. मुळशी पॅटर्न हा चित्रपट देखील पुणे जिल्ह्यातील वाढते औद्योगिकरण आणि जमिनीच्या (Land) खरेदी-विक्री व्यवहारातून वाढलेल्या गुंडगिरीवरच आधारित आहे. आता, पुन्हा एकदा जमिनीच्या वादातून एका वकिलाने बंदूक (Gun) बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वादातील जमिन पाहण्यासाठी आलेल्या वकिलाची जमिन मालकाने अडवणूक केल्यानंतर संबंधित वकिलाने चक्क बंदुकीचा धाक दाखवल्याचं पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement


वादातील जमीन पाहण्यासाठी गेलेल्या वकिलाने थेट बंदूक बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी लगतच्या कासारसाई इथं घडला. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंदूक दाखवणाऱ्या वकिलांचे नाव संदीप भोईर असं आहे, ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र, ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्यानं यासाठी गेली 10 ते 12 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यातच, आज दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे कासारसाईत गेले, तेंव्हा त्या वादातील जमिनीच्या ठिकाणी निघाले असता मुलानी कुटुंबात अन् त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी, वकील महोदयांसह आलेले काहीजण पळताना व्हिडिओत दिसून येत आहे. 


मुलानी कुटुंबातील सदस्याने वकील महोदयांना अडवण्याचा प्रयत्न केला. या वादात वकील भोईरने कंबरेला अडकवले बंदूक बाहेर काढले, तेंव्हा मुलानी कुटुंब आक्रमक झाल्याचं दिसून आलं. हे पाहून वकील आणि त्यांच्या साथीदाराने तिथून पळ काढला. आता, दोन्ही बाजूच्या मंडळींना हिंजवडी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं असून, पोलिसांकडून चौकशी करुन पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा पुणे, पिंपरी चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी, जमिनीच्या वादातून होणारे वाद ही गंभीर समस्या असल्याचं स्पष्ट झालंय. 


हेही वाचा


गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर