पुणे : औरंगाबादमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न सोडवण्याठी मोर्चा काढल्यानंतर आता पुणेकरांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. पुण्यामध्ये राज्यसेवा परीक्षा देणारे विद्यार्थी मोर्चा काढणार आहेत.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं तीन वर्षांत केवळ 69 जागांची जाहिरात काढली आहे. जागांची संख्या कमी असून जास्त जागांसाठी जाहिरात द्यावी अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी काढणार आहेत. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.

पुण्यात एमपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

1) राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी
2) संयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे PSI/STI/ASO ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी
3) MPSC ने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी
4) MPSC ने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत
5) राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी
6) MPSC ने तामिळनाडू पॅटर्न राबवावा
7)  तलाठी पदाची परीक्षा MPSC द्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी
8) MPSC ने C-SAT या विषयाचा पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करावा
9) स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्यात यावी
10) आयोगाकडून जे प्रश्न चुकतात आणि रद्द करण्यात येतात त्याचे आयोगाने संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे
11) राज्य आणि जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात