Pune mother Temple: स्वामी तिन्ही जगाचा आईविणा (Pune news) भिकारी, असं म्हटलं जातं. आईसाठी आतापर्यंत त्यांच्या मुलांनी अनेक गोष्टी केल्याचं आपण पाहिलं आहे. कधी आईला मोठं गिफ्ट दिलं तर कधी आईला अभिमान वाटावा असं कार्य केलं. मात्र आईच्या निधनांनतर आईचं आयुष्यात नसणं हे सहन न झाल्याने पुणे (Bhor) जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांद गावातील दोन भावांनी थेट आईचं स्मारक बांधलं. त्यांचं आई प्रति असलेलं प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. 


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांद गावातील शिक्षक सुनील दत्तात्रय गोळे आणि  मेकॅनिक असलेल्या संतोष दत्तात्रय गोळे या दोघांच्या आईचं निधन झालं. राहीबाई गोळे असं त्यांच्या आईचं नाव होतं. कोरोनामुळे राहीबाई यांचं पुण्यातील बाणेरमध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्यानं कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला होता. शिवाय नातोवाईकांनीही राहीबाई यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली होती. त्यामुळे आईवर असलेलं प्रेम आणि तिच्यावर इतरांची असलेली श्रद्धापाहून दोन्ही भावांनी आईचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय कुटुंबियांसमोर मांडला आणि नातेवाईकांनादेखील सांगितला, त्यावेळी त्यांची ही कल्पना सगळ्यांना आवडली आणि दोन भावांनी मिळून त्यांच्या आईला अनोखी आदरांजली देण्याचा निर्णय घेतला. 


राहीबाई सामाजिक कार्यकर्त्या होत्या...


मरावे परी कीर्तिरूपे उरावे, असं राहीबाई यांचं व्यक्तीमत्व होतं. त्यांना शेतीत आणि सामाजित कार्यात विशेष रस होता. गावातील लोकांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं. त्यांचे पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत 45 वर्ष त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांच्याबाबत असलेलं प्रेम अनेकांनी बोलून दाखवलं त्यामुळे कुटुंबीयांनी थेट आईचं स्मारक उभारलं. राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनील, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी मिळून राहीबाई यांना अनोखी आदरांजली दिली आहे. 


आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा


आईचं अवतीभवती नसणं हे दोन्ही मुलांना मान्य होत नव्हतं. तिच्या आठवणीत नेमकं काय करु शकतो? याचा विचार करताना या स्मारकाची कल्पना सुचली आणि दोन्ही भावांनी मिळून आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा घरासमोच्या अंगणात  स्थापन केला. त्यानंतर  एप्रिलला या पुतळ्याचं गावकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण केलं. त्यांच्या या कृत्याचं सध्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे आणि आईच्या स्मारकाची चर्चादेखील होत आहे.