पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू हर्षवर्धन चव्हाणचा त्याच्या आईनेच जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. 11 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न करुन आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील खडक परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हर्षवर्धनच्या डोक्यात दगडी पाटा घालून आई अंजली चव्हाणने त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अंजलीने तोच पाटा स्वतःच्या डोक्यात मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अभ्यास न केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर आईने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
हत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या हर्षवर्धनवर पुण्यातील केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तिथेच त्याच्या आईवरही उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पुण्यातील खडक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे. खडक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.