पुणे: 'सैराट' फेम आर्ची-परशा आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत सेल्फी काढणं आता सोपं झालं आहे.


कारण लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये आता रिंकू राजगुरु, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे या तिघांच्या मेणाच्या पुतळ्यांचे आगमन झाले आहे.

लोणावळ्याच्या पर्यटनस्थळी तुम्ही आता या तिघांना बिनधास्त भेटू शकता, अगदी सेल्फी ही काढू शकता.

२९ एप्रिल २०१६..... सैराट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशाला झिंगाट करणारी जोडी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परशा अर्थात आकाश ठोसर ही दोन नावं चित्रपटसृष्टीसह प्रत्येकाच्या मुखात घोळू लागली. तर सामाजिक विषयांत हात घालण्यात पटाईत असलेला दिग्दर्शक नागराज मंजुळे 'सैराट'मुळं यशाच्या शिखरावर पोहोचला.

सैराट प्रदर्शित झाल्यापासून या तिघांच्या खासकरुन आर्ची-परशाच्या मागे त्याच्या चाहत्यांचा गराडा सर्वानीच अनुभवला. त्यांना भेटण्यासाठी काहींनी चोऱ्या-माऱ्या केल्या तर कित्येकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र बॉडीगार्ड आणि बाउन्सरची सुरक्षा ते भेदूच न शकल्यानं चाहते एका झलकसाठी अद्याप ही त्रासून आहेत.

यातच सैराटला वर्ष उलटलं. पण या निमित्तानं आर्ची-परशासह नागराजला तुम्हाला कधीही भेटण्याची संधी पुण्याच्या लोणावळ्यात प्राप्त झाली आहे.

तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आर्ची-परशा आणि नागराज या तिघांच्या मेणाच्या पुतळ्यांचे आगमन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, बिग बी अमिताभ बच्चन, भारताला क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्यासह देश विदेशातील राजकीय मंडळी, समाजसेवक, कलाकार आणि खेळाडू अशा शंभरहून अधिक दिग्गजांच्या रांगेत आता सर्वांना झिंगाट करून सोडणारी 'सैराट'मय जोडी आर्ची-परशा आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे उभे राहिले आहेत.