पुणे : मल्टिप्लेक्सच्या मनमानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध केला. यासोबतच मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याने थिएटर व्यवस्थापकला मारहाणही केली. किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि मनसैनिकांनी पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआरमध्ये गुरुवारी दुपारी जाऊन आंदोलन केलं.

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे? 10 रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी पीव्हीआर दणाणून सोडलं. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी पीव्हीआर व्यवस्थापनाला यासंदर्भातील निवेदनही दिलं.

यापूर्वीही अनेक वेळा या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टिप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे मनसेने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निवेदनावर आपण लवकरच कार्यवाई करु, असं आश्वासन व्यवस्थापनाने दिलेलं आहे. खाद्यपदार्थांचे दर कमी झाले नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करु अशा इशारा मनसेने दिला आहे.

तर दोन दिवसांपूर्वी हायकोर्टानेही यासंदर्भात राज्य सरकारला सवाल केला आहे.

दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी चतुश्रुंगी पोलिस स्टेशनला मनसेचे किशोर शिंदे आणि दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ