पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या 3, तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाने महापालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला असून राष्ट्रवादीचे हे तीन नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
विनायक गायकवाड, राजेंद्र जगताप आणि शत्रूघ्न काटे हे राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. तिघेही भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक समजले जातात. अनेक दिवसांपासून या तिघांचीही भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळे तिघांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे.
तर काँग्रेसचे जालिंदर शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून राष्ट्रवादीच्या तिकिटावरच ते निवडणूक लढवतील, असं बोललं जात आहे.
दरम्यान शिवसेनेकडून युती तुटल्याची घोषणा होताच पिंपरी चिंचवड महापालिकेतील पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आता चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक जवळ येईल, तसा राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.