Pune Metro: पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला 28 तासांहून अधिक तास उलटूनही अजून मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका सुरु आहेत . पुण्यातील रस्त्यांवर कालपासून अलोट गर्दी आहे . विसर्जन मिरवणूक पाहून पुणेकरांनी गर्दी टाळण्यासाठी मेट्रोला प्राधान्य दिलं .सोपा पर्याय म्हणून मेट्रो निवडली खरी पण पुणे मेट्रोत तुफान गर्दी झाली होती . मेट्रोसाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . या गर्दीचे काही व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . राज्यभरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने भाविकांच्या सोयीसाठी पहाटेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता .विसर्जनाच्या दिवशी तब्बल 41 तास मेट्रो सेवा अखंड सुरू होती .
काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली.
पुणे मेट्रोत तुफान गर्दी
गणेश विसर्जनाची रात्र पुण्यात जल्लोषात पार पडली. मिरवणूक पाहून झाल्यानंतर पुणेकरांनी घर गाठण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं. गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी खासगी वाहनं किंवा बसऐवजी मेट्रोचा सोपा पर्याय निवडला. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोत दाखल झाल्याने तुफान गर्दीची परिस्थिती निर्माण झाली.
शनिवारी रात्री साधारणपणे 11 वाजताच्या सुमारास ही गर्दी होती. विशेष म्हणजे, विसर्जनाच्या रात्री पुणे मेट्रो सेवा रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. तरीदेखील मेट्रो स्थानकांवर विशेषतः सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी लगबग दिसून आली. सिव्हिल कोर्ट हे पुणे मेट्रोचे महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. येथून प्रवासी पिंपरी-चिंचवड, स्वारगेट, कोथरुड तसेच रामवाडी या दिशांना जाणाऱ्या मेट्रो मार्गांवर प्रवास करू शकतात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीनंतर एकाचवेळी हजारो पुणेकरांनी या स्थानकाचा वापर केला. परिणामी स्थानक परिसरात आणि मेट्रो गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो
गणेशोत्सव काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर मानाचे गणपती आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते .या पार्श्वभूमीवर महामेट्रो ने 27 ते 29 ऑगस्ट या पहिल्या तीन दिवसात मेट्रो सेवा सकाळी सहा ते अकरा पर्यंत सुरू ठेवली होती .तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सेवा सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजेपर्यंत चालेल असे सांगितले होते .
हेही वाचा