पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार येथे खोली भाड्याने घेऊन रेकी करणाऱ्या दत्ता बाळु काळे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. या बाळु काळेला खोली भाड्याने देऊन त्याबाबत पोलिसांना माहिती न दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका महिलेविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एटीएस पथकातील पोलीस अंमलदार सारंग कर्डेकर यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार आंबेगाव पठार येथील गजानन कॉलनीत राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीने आपल्या मालकीच्या घरामध्ये किंवा मालमत्तेमध्ये इतरांना राहण्यासाठी जागा दिल्यास त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. अशी माहिती न दिल्यास हे पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन ठरते आणि कारवाई करण्यात येते. याबाबत विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी आदेश जारी केलेले आहेत.
सदर महिला आंबेगाव पठार येथील पांडुरंगनगर भागातील खेडेकर चाळ या त्यांच्या मालकीच्या मालमत्तेत राहत होती. यातील एक खोली 30 ऑगस्ट 2025 रोजी दत्ता बाळु काळे (आंदेकर टोळीतील सदस्य) याला तिने 5,000 रुपये डिपॉझिट घेऊन भाड्याने दिली. या खोलीसाठी दरमहा 3,000 रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. मात्र खोली भाड्याने देताना भाडेकरारनामा करण्यात आला नाही. शिवाय काळे याच्याकडून कोणतेही ओळखपत्र वा इतर कागदपत्रे घेण्यात आली नव्हती. तसेच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती. पोलिसांनी दत्ता काळे याला अटक केल्यानंतर त्याने ही खोली घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर तपासात ही माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपावरून घरमालकिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गँगवॉरमध्ये आयुष कोमकरचा बळी
पुण्यात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंडू आंदेकर याचा जावई आणि वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (१८) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दोघांनी गोविंद ऊर्फ आयुष कोमकर याच्यावरती तीन गोळ्या झाडून निर्घृण खून केला. गोविंद त्याच्या नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना हा हल्ला झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि तपासाला सुरूवात केली. हत्या झालेल्या ठिकाणी आज पोलिसांचा बंदोबस्त आहे, पुण्यातील नाना पेठेत कालच्या घटनेनंतर आज तणावपूर्ण शांतता आहे. झालेल्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना विसर्जन मिरवणुकीवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजित पवारांनी काल पुण्यामध्ये झालेल्या गॅंगवॉर, मर्डर याची माहिती घेतली आहे.