पुणे : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे, गणेशोत्सव काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक पुणे, मुंबई या ठिकाणी येतात, गणेशोत्सव काळात गणपती देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, त्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने (महामेट्रो) (Pune Maha Metro) गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा (Pune Maha Metro) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांना देखावे पाहण्यासाठी आणि रात्री उशीरा प्रवासासाठीची सोय होणार आहे.(Pune Maha Metro)
पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार
पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. मानाचे गणपती, विविध प्रकारचे देखावे पाहण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरील गणेशभक्त येतात. गणेशोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी गणेशोत्सवावेळी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही मेट्रो स्थानकं थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते, त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्यासाठी जाता येणार आहे. या काळात रात्री उशिरापर्यंत देखावे, गणपती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडई, कसबा या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गर्दी टाळता येणार आहे. भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
अशी वाढविण्यात आली वेळ
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दि. 06 रोजी सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड सुरू राहणार आहे. तर, दि. 27 ते 29 ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील, तर दि. 30 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे.