Pune: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत येणाऱ्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिकांना अखेर शासनाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन्ही मेट्रो प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. (Pune Metro )

Continues below advertisement

या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या दोन्ही उपमार्गिकांच्या अंमलबजावणीमुळे पूर्व पुणे आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दोन्ही प्रकल्पांसाठी किती कोटींचा खर्च?

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांची एकत्रित लांबी 16 किलोमीटर इतकी असून या मार्गांवर एकूण 14 उन्नत स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. या दोन प्रकल्पांसाठी तब्बल 5,704 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पूर्णतः उन्नत मेट्रो मार्गिकांची अंमलबजावणी ‘महा मेट्रो’ मार्फत करण्यात येणार असून, या निर्णयामुळे पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

Continues below advertisement

पुणेकरांचा प्रवासवेळ वाचणार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड या उपमार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारेल. यामुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड आणि आसपासच्या ग्रामीण भागाला थेट मेट्रो जोडणी मिळेल. लाखो प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि किफायतशीर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल.” या दोन्ही उपमार्गिका सुरू झाल्यानंतर पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल, तसेच वाहनवाढीमुळे वाढणाऱ्या प्रदूषणातही घट होईल, अशी अपेक्षा आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल आणि पूर्व पुण्यातील आर्थिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गतिशीलतेत भर पडेल.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुढे सांगितले की, “पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत ही दोन उपमार्गिका केवळ पायाभूत सुविधेचा विकासच नाही, तर नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणारा निर्णय आहे. राज्य सरकार सातत्याने पुणे आणि परिसरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.” या मंजुरीनंतर हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.