Hemant Dhome On Pune Shirur Leopard Attack: शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) बिबट्यांच्या हल्ल्याच्या (Shirur Leopard Attack) घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. गेल्या 15 दिवसांमध्ये दोन लहान मुलांसह एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडलेली. अशातच एका बिबट्याला पुण्याच्या मंचरमध्ये जेरबंद करण्यात यश आलं आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं 11 पिंजरे लावले होते. मात्र 13 वर्षीय मुलावर हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का? याबद्दल तपास सुरू आहे. वन विभाग सातत्यानं प्रयत्न करत असूनही या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार कायम आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झालेत. अशातच या प्रकरणी मराठी अभिनेता,दिग्दर्शक हेमंत ढोमेनं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
मराठी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) पुण्यातील शिरुरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनेसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यानं या ट्वीटमधून तळमळ व्यक्त केली असून यासोबत बिबिट्याच्या पावलांचे ठसे असलेला फोटो शेअर केला आहे.
हेमंत ढोमेनं ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
हेमंत ढोमेनं ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला… लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला…सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात… आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात माझ्या भागात 11 मृत्यू झाले आहेत… चित्र खूप भयानक आहे… प्रचंड भीती आहे… पशूधनाची तर यात मोजणी सुद्धा झालेली नाही.आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय त्यात हे जंगली संकट!"
यानंतर हेमंतनं पुढे म्हटलंय की, "आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक कायदा हातात घेणार यापेक्षा human-wildlife conflict वर sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत… जनजागृती व्हावी… मागेच जवळपास 20 वर्षांपूर्वी याबाबतीत विद्या अथ्रेया यांनी प्रचंड काम केलं आहे त्याकडेही डोळेझाक झाली आहे… आपण जंगलात घुसलो आहोत हे बरोबर आहे पण जंगलापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे… जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय.हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे… एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक???"
दरम्यान, मानवी वस्तीतील शिरकाव आणि सततच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. यामुळे जुन्नर भागातील बिबट्यांचं स्थलांतर करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच बिबट्याच्या नसबंदीचा कार्यक्रमही हाती घेण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यासाठी केंद्राशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान बिबट्यांची संख्या वाढल्यानं इतर राज्यातील वनविभाग आणि वनताराला हे बिबटे पाठवण्यात येणार आहेत. तर नरभक्षक बिबट्याला वनताराला पाठवण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिलीय. मात्र बिबट्यांचं स्थलांतर करताना नेमक्या कोणत्या मार्गदर्शक सूचना पाळल्या जाणार याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :