Hinjawadi Shivaji Nagar Metro: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Sppu) येथील उड्डाणपुलाचे काम हिंजवडी-शिवाजीनगर (Hinjawadi shivaji nagar metro) मेट्रोच्या कामासोबत सुरू होणार आहे. या बांधकामामुळे या भागातील वाहतूक कोंडीत वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्र्यांना उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग कसा बांधला जाईल, हे दाखवून त्यांच्या संमतीनंतरच कामाला सुरुवात करावी, असा निर्णय घेण्यात आला. नव्या सरकारमध्ये पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेची आता शहराला प्रतीक्षा आहे.
गणेशखिंड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि इतर कामांचा आढावा घेण्यासाठी काल पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि वाहतूक पोलिसांच्या विविध विभागांची संयुक्त बैठक झाली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, पीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे विद्यापीठ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या चौकात लवकरच मेट्रोचे कामही होणार आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीसाठी महापालिकेने 400 कोटींचा आराखडा तयार केला आहे मात्र हे काम पीएमआरडीए करणार आहे. या कामात विद्यापीठ चौकातील डबलडेकर उड्डाणपूल (268 कोटी), शिवाजीनगर-औंध भुयारी मार्ग (68 कोटी), बाणेर-पाषाण (25 कोटी), हरे कृष्ण मंदिर भुयारी मार्ग (15 कोटी), अभिमानश्री चौक भुयारी मार्ग (40 कोटी) यांचा समावेश आहे.
मेट्रोचे काम पीएमआरडीकडून येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे, त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील हे प्रकल्प त्याच कालावधीत पूर्ण करणार आहेत. आज बोलावलेल्या बैठकीत हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काम सुरू झाल्यानंतर गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. पर्यायी वाहतूक मार्ग सुरू करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. पादचारी मार्ग आणि सायकल मार्ग देखील बांधावे लागतील. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री झाल्यानंतरच विद्यापीठ चौकासह बाकी ठिकाणी काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोंडी कमी करण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो बॅरिकेडिंगसाठी कमी जागा वापरा, ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे तेथून बॅरिकेडिंग काढून रस्ता खुला करा, गणेश खिंड रस्त्यावर पादचारी मार्ग आणि सायकल मार्ग लहान करा, रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजवा, कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पाण्याचे नळ तात्काळ काढा, पुणे सेंट्रल मॉलकडून शिवाजीनगरकडे जाताना उजवीकडे वळण्यास मनाई असेल, कृषी महाविद्यालयातील उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेऊन जाणं शक्य असेल, या सगळ्या सूचनांचा समावेश आहे.