पुणे : पुण्यातील दोन मेट्रो (Pune Metro) मार्गिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याच्या कामाला गती मिळाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मेट्रो कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच वाहतूक पोलीसांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे.


गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक 45 मीटर रुंदीचा रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे, आवश्यक तेथे वाहतूक वळविणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.


प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने उशीर लागता कामा नये, असे निर्देश देतानाच उपमुख्यमंत्री  पवार यांनी संबंधित जागांशी निगडित प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन थेट संपर्क साधत सूचना केल्या. तसेच खासगी जागांबाबतही जागामालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. भविष्यातील 50 वर्षांचा विचार करुन प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग या कामाचा तसेच समस्यांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. 


अजित पवारांची मेट्रोवारी


पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण आज होणार आहे. तसेच खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण याशिवाय, पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण आज होणार आहे. यानिमित्ताने आज कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाज दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवासी नागरिकांशी संवाद साधला.


इतर महत्वाची बातमी-


CM eknath shinde : एकनाथ शिंदे नाराज आहेत का? चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं...