पुणे : पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं पैशासाठी केलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. चमेली अमित गुटाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.
चमेली स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर होती. 2015 मध्ये अमित गुटाळशी तिचा विवाह झाला. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी, माहेरुन पैसे आणावेत अशी मागणी अमितनं केली. त्यासाठी त्यानं चमेलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अमित पैशांसाठी चमेलीकडे तगादा लावायचा, त्याचप्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशयही घ्यायचा, असा आरोप होत आहे. चमेलीच्या आत्महत्येनंतर तिच्या भावानं सहकारनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर चमेलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अमित गुटाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.