देहू, पुणे : मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर (Ajay Baraskar) यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे, असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे बारस्कर यांनी मी देहूतून आलो आहे असे देखील सांगितले. त्यावर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बारस्कर आणि आमचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नसून अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.
'मराठा तितुका घोळवावा राजकारण धर्म वाढवावा, अशी परिस्थिती राज्यात राजकारण्यांनी निर्माण केली आहे त्याच राजकारण्यांचं पिल्लू म्हणून अजय बासरस्कर हा व्यक्ती राजकारण्यांनी पुढे आणला आहे. या माणसाचं आम्ही नामकरण करत आहोत. त्यांचं नाव अजय बारस्कर नसून अजय बावळटकर आहे. तुकाराम महाराजांचे वंशज आणि संस्थान मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांच्या मागे कायम उभे आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मिळून या बारस्करांचा निषेध करतो. त्यांचा या संस्थानाशी काहीही सबंध नसल्याचं संस्थानाने स्पष्ट केलं आहे.
अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला होता. मनोज जरांगे खोटारडा माणूस आहे, तो रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका झाल्या, असे घणाघाती आरोप अजय बारसकर यांनी केले होते. अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला होता.
इतर महत्वाची बातमी-