Continues below advertisement

पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे (Leopard Attack) तरुणांची सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. पोरं आता स्वतःच्या पायावर उभी राहिलेत, आता कधी एकदा त्यांच्या डोक्यावरती अक्षता पडतात या आतुरतेने आई-वडिलांचा जीव व्याकुळला आहे. ही पोरही लग्नाची स्वप्न रंगवत आहेत हे खरं. पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेला बिबट्या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडतोय असं चित्र आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे त्या गावात आपल्या मुली देण्यासाठी पालक धजावत नाहीत असं चित्र आहे. असंच धक्कादायक वास्तव्य आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमध्ये. केवळ बिबट्याच्या भीतीपोटी या परिसरातील तरुणांना आपल्या पोटचा गोळा देण्यासाठी मुलीचे आई-वडील तयार नाहीत.

Continues below advertisement

Pune Leopard Attack News : मुली देण्यास पालकांचा नकार

या गावातील तरुणांशी सोयरीक जोडण्यास स्पष्ट नकार मिळत असल्याने शेकडो तरुणांची लग्नं रखडली आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसात 'मामाचे गावही नको रे' अशी म्हणण्याची वेळ अनेक लाडक्या भाच्यांवर आली आहे.

Pune Leopard News : मुलांना मुली मिळत नसल्याने पालकांची चिंता

गावागावातील शेतशिवारांमध्ये झुंडीने फिरणाऱ्या या बिबट्यांच्या टोळीने आजपर्यंत कित्येक पशुधनावर तर हल्ला केलाच, मात्र अनेकांचे बळीही घेतले आहेत. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरील झाला असून गावातील शेकडो तरुण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असूनही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने पालकांची चिंता मात्र वाढली आहे.

Pune News : जुन्नरनंतर आंबेगावमध्येही बिबट्यांचा टोळीचा मुक्त वावर

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून आंबेगाव तालुक्यातील थोरादळे येथे तीन बिबटे एकत्र फिरताना पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वनविभागाने तातडीने या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. गेल्या काही दिवसापासून बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता नागरिकांचं भर दिवसा घराबाहेर पडणं अवघड झालंय. त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.

राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

ही बातमी वाचा: