पुणे : पुण्याच्या स्वारगेट भागातल्या महिला स्वच्छतागृहात, मोबाईल कॅमेऱ्यानं चोरीछुपे शुटींग केल्याप्रकरणी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलंय. यातील एक पीएमपीचा सफाई कर्मचारी आहे, तर दुसरा कर्मचारी शिकाऊ संगणक ऑपरेटर म्हणून काम करतो.
पीएमपीमधील संबंधित महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेल्या असताना त्यांना पुरुष शौचालयातून मोबाईल बाहेर आलेला दिसला. त्यानंतर त्या महिलेनं आरडाओरडा करुन शिपायाला बोलावलं. तेवढ्या वेळात तो मोबाईल काढून कोणीतरी घेऊन गेल्याचं कळलं. त्यावेळी तेथून जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर महिलेनं शंका उपस्थित केली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान या दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पीएमपीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं.