पुणे : दिवसभर सुरु असलेल्या तुफान पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढवण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणात पंधरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या आधी खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. पावसाच्या तीव्रतेनुसार त्यामध्ये कमी अधिक केले जाऊ शकते असं प्रशासनाने सांगितलं होतं. पण धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत असल्याने खडकवासल्यातून 15 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यातच शुक्रवारी पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इंद्रायणी नदीचं पाणी पोहोचलं. मंदिरात जाण्यासाठी भक्तिसोपान पुलाचा वापर केला जातो. मात्र पावसाचा जोरच एवढा होता की या पुलाचं रेलिंग तुटून वाहून गेलं.
Pandharpur Rain Update : पंढरपूरवर पुराचे संकट
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होत आहे. सध्या उजनी धरणाने 60 टक्के पातळी ओलांडली असून आधीच 11 हजार क्युसेकनं पाणी उजनी धरणात जात आहे. तुफान पाऊस आणि खडकवासलातून सुरु असलेल्या विसर्गामुळे आषाढी यात्रेपूर्वीच पंढरपुरात पुराचे संकट येऊ शकते.
Godawari River Rain : गोदावरी पातळीत वाढ, अनेक घरात पाणी शिरलं
पावसानं नाशिकला चांगलंच झोडपल्याचं दिसून येतंय. सकाळपासून पावसाच्या नॉन-स्टॉप बॅटिंगमुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही गोदावरीनं नदीपात्रालगतच्या रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना प्रवाहात खेचून घेतलं. जेव्हा वाहनं पार्क केली होती तेव्हा पाणी नव्हतं, मात्र अचानक पाणीपातळी वाढल्यानं वाहनं वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तसंच नदीलगतच्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. अचानक गोदावरीची पातळी वाढल्यामुळे अनेकांच्या घरातलं आणि दुकानातलं सामान वाहून गेलं.
मुसळधार पावसामुळे जुने नाशिक परिसरात एक वाडा कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या नाशकात सातशेपेक्षा धोकादायक आणि जुने वाडे असून प्रशासनानं त्यांना नोटीसाही धाडल्या आहेत.
Khed Jagbudi River Flood : जगबुडी नदीला पूर आला
जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड मधील बाजारपेठेमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. एनडीआरएफची टीम देखील खेडमध्ये पोहोचली आहे. गुरुवार सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय.
Raigad Heavy Rain : रायगडमधील नागोठणेमध्ये पुराचं पाणी
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रोहा, नागोठणे, खालापूर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला. नागोठणे शहराला आंबा नदीने घेराव घातल्याने संपूर्ण शहर आणि कोळीवाडा पुराच्या पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागोठणे शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने येथील दुकानदार आणि व्यावसायिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं.
रायगडमधील खालापूर तालुक्यासह खोपोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पाताळगंगा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील पुलाला पाणी लागल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.