पिंपरी चिंचवड : संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीत अपघात झाला. दिवेघाटात ब्रेक फेल झालेला जेसीबी थेट दिंडीमध्ये घुसला. यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36 वर्षे) यांच्यासह अतुल महाराज आळशी (वय 24 वर्षे) या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी हडपसर इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

आळंदी इथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरहून आळंदीला येत होती. मात्र आज सकाळी 9.15 च्या सुमारास जेसीबी घुसला. घाट उतरत असताना, त्याचा ब्रेक फेल झाल्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये जेसीबी घुसला. यात 15 वारकरी जखमी झाले. तर संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह एका वारकऱ्याचा मृत्यू झाला.

संजीवन समाधी सोहळ्यापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला ताब्यात घेतलं आहे.