पुणे : मुंबई ठाण्यासह पुण्यातही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यंदा कोरोनानंतर दोन वर्षांनी दहीहंडी होणार असल्याने गोविंदांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतो आहे. पुण्यात अनेक पारंपरिक दहीहंडी आहेत त्यात महत्वाच्या दहीहंडीच्या जल्लोषाच्या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते. लाखो लोक, लाखोंची बक्षिसं,सामाजिक कार्यकर्ते, सेलेब्रिटी आणि प्रसिद्ध DJ हे पुण्यातील दहिहंडीचं आकर्षण असतं. त्यात ढोलताशांचा जल्लोशही बघायला मिळतो.


पुण्यातील महत्वाच्या अशा 10 दहीहंडी मानल्या जातात. या दहीहंडी पाहण्यासाठी लाखो पुणेकर एकत्र येतात. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. बाबूगेनू, दगडूशेठ मंडळ, मनसेची महिला दहीहंडी मंडळ, अकरा मारुती चौक खजिना विहीर दहीहंडी मंडळ गुरुजी तालीम मंडळ, शनिपार मंडळ, जिलब्या तरुण मंडळ या दहीहंडी पुण्यातील सगळ्यात मोठ्या दहीहंडी आहेत. जुन्या आणि महत्वाच्या दहीहंडी म्हणून या मंडळांची ओळख आहे. 


यातील प्रत्येक दहीहंडीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक दहीहंडी फोडण्यासाठी नेमकं कोणत्या पथकाला बोलावलं जातं, याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असतं. किमान 4 ते 5 थर लावून ही दहीहंडी फोडली जाते. मात्र यंदा 7 थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात बाबूगेनू, दगडूशेठ मंडळ,मनसेची महिला दहीहंडी मंडळ या तीन ठिकाणी पुणेकरांची आलोट गर्दी असते. शिवाय पथकांना लाखो रुपयांची बक्षिसंदेखील दिली जातात. 


दहीहंडी पथकांचा मान...


पुण्यात शेकडो दहीहंडी पथकं आहेत. मात्र काही पथकं मोठ्या दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पथकांचे गोविंदा साधारण चार ते सहा थर लावतात. एका दिवसांपासाठी या महत्त्वाच्या पथकाचे गोविंदा योग्य सराव करतात. मागील दोन ते तीन दशकांपासून ही पथकं दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत असतात. त्यातील भोईराज मित्र मंडळ हे 24 वर्ष जुणं पथकं आहे. त्यानंतर शिवतेज गृप, वंदे मातरम् मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, गुरुजी तालीम मित्र मंडळ ही पुण्य़ातील मोठी आणि प्रसिद्ध गोविंदा पथकं आहेत. शिवाय़ पुण्यात बारामतीतील पथकंदेखील दहीहंडी फोडण्यासाठी बोलवली जातात. 


शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी 


शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.


इतर महत्वाची बातमी :


Dahi Handi 2023 : दहीहंडी पथकात किती गोविंदा असावेत, याचा नियम का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल