पुणे : पुण्यातील जैन समाजाच्या ट्रस्टच्या जागेवरुन (Jain Boarding Hostel) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आरोप केले. मात्र जैन समाजाची ही जागा ज्या विशाल गोखले या बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला, त्या गोखले यांच्या सोबत मुरलीधर मोहोळ यांचे आता कोणतेही व्यवसायिक संबंध नसल्याचं कागदपत्रांवर दिसून येतंय.
पुण्यातील जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचा आरोप करत जैन समाजाने आंदोलन केलं. पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात जैन बोर्डिंग हाऊस आहे. या बोर्डिंग हाऊसच्या जागेची विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप जैन समाजाने केला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी मिळून ही जमीन हडपली असल्याचा आरोपही करण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टींनीही त्यांच्या भाषणावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले.
Murlidhar Mohol : मोहोळांची भागिदारी नाही
दरम्यान, राजू शेट्टींनी आरोप केल्यानंतर एबीपी माझानं या प्रकरणाचा रिअॅलिटी चेक केला. जैन समाजाची जागा विशाल गोखले या बांधकाम व्यावसायिकाला 2025 मध्ये विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला. विशाल गोखले यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ 2021 पासून व्यवसायिक भागीदार होते. मात्र फेब्रुवारी 2025 ला मुरलीधर मोहोळ हे भागीदारीतून बाहेर पडले होते. सध्या या विशाल गोखलेंसोबत मोहोळ यांचे कोणतेही व्यवासायिक संबंध नसल्याचं कागदपत्रांमधून दिसून येतं.
Jain Boarding Hostel : जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता.
काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा संबंध आहे.
ही बातमी वाचा: