पुणे: शहरातील कोथरुड (Pune) येथे असलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत झालेल्या जागेचा व्यवहार अखेर गोखले बिल्डर्संकडून रद्द करण्यात आला आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी ⁠जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला होता. गोखलेंनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केला. त्यानंतर, आता विजय गोखले यांनी माध्यमांसाठीही अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केली. जैन (Jain) धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्यावतीने विशाल गोखले यांनी अधिकृतपणे दिली.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येथील मंदिर हे आमच्यासाठी देखील पूजनीय आहे व जैन बांधवांच्या संबंधित मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळे, सदर मंदीर व वसतिगृहाची इमारत याविषयी जैन धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्यावतीने विशाल गोखले यांनी अधिकृतपणे दिली.

बिल्डर विजय गोखलेंची माघार

जैन बोर्डिंग जागेचा सदर व्यवहार रद्द करण्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र आम्ही सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या ट्रस्टला इमेलच्या माध्यमातून पाठवले आहे, असेही विशाल गोखले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या जैन बांधव आणि शिवसेना नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या लढ्याला यश आल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्याने हे प्रकरण चांगलेच तापले होते. त्यातच, रविंद्र धंगेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिले, तसेच मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. अखेर, वाढता दबाव लक्षात घेता आधी मोहोळ यांनी काढता पाय घेतल्यानंतर, आता गोखलेंनी या व्यवहारातून माघार घेतली आहे. 

Continues below advertisement

व्यवहार रद्द, रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया

दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं. तसेच, पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं 2 दिवसात तोडगा निघेल, म्हटल्यामुळे आपण आनंदी असून हा गतीमान आणि बोगस व्यवहार झाला, त्याची चर्चा संपूर्ण देशात झाल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. आता, हा व्यवहार रद्द झाल्याचं निश्चित झालं आहे.

हेही वाचा 

महायुती असतानाही नडले, शेवटी बिल्डरनेच जैन बोर्डिंगच्या जागेचा नाद सोडला; रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...