इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2017 07:36 PM (IST)
पुणे : 'इन्फोसिस'मधील इंजिनिअर तरुणीला ठार मारणाऱ्या सुरक्षारक्षकाने तिच्या हत्येनंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकटक का बघतोस, याचा जाब विचारल्याच्या रागातून 'इन्फोसिस'मधील इंजिनिअर तरुणी रसिला ओपीची भाबेन सैकियाने हत्या केली होती. तरुणीची केबलने गळा दाबून हत्या केल्यानंतर आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणाला विचार बदलल्याचा दावा सुरक्षारक्षकाने पुणे पोलिसांकडे केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोपीचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्याचा दावा फेटाळून लावला आहे. ही हत्या पूर्वनियोजित असल्याकडे पोलिसांनी लक्ष वेधलं आहे. हत्येनंतर आपण आसाममध्ये असलेल्या आईला फोन केल्याचंही आरोपी सुरक्षारक्षकाने म्हटलं आहे. हत्येबाबत सांगितल्यानंतर आईने पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे पोलिसांकडे कबुली दिल्याचंही त्याने म्हटलं आहे. पोलिसांनी मात्र त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नसल्याचा उल्लेख केला आहे.