पुणे: हिंजवडीत आयटी हबमधील टेम्पो (Crime News Update) ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलं आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. या प्रकरणाने नेमकं वेगळं घेतलं आहे, या चालकाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस चौकशीमध्ये त्याने सर्व माहिती दिली आहे. दरम्यान टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून उरलेलं बेंझिन केमिकल कुठं आहे? बेंझिन केमिकल किती घातक आहे? निष्काळजीपणा प्रकरणी व्युमो ग्राफिक्सवर गुन्हा दाखल होणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे.


हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी चालकाने एक लिटर बेंझिम केमिकलचा वापर केला होता. मात्र आणखी चार लिटर बेंझिन केमिकल व्युमो ग्राफिक्स कंपनीतून चोरीला गेल्याचं आणि ते चालक जनार्दन हंबर्डीकरकडे असल्याचं बोललं जातं आहे. मग उरलेल्या बेंझिन केमिकल कुठं आहे आणि याचा वापर कशासाठी करणार होता का? याचा तपास पोलीस करणार आहेत. बेंझिन केमिकल बाजारात सामान्य व्यक्तींना उपलब्ध होत नाही. याची कल्पना असताना व्युमो ग्राफिक्स कंपनीने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्टपणे समोर आलं आहे. त्यामुळं कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 


या प्रकरणी हिंजवडीचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात बेंझिन केमिकल हे ज्वालाग्रही आहे अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार कंपनीमध्ये साफसफाई करण्यासाठी या केमिकलचा वापर केला जातो. ही भीषण आग पहिल्यानंतर कळेलच की हे किती घातक आहे. आगीच्या संपर्कात आल्यानंतर उडालेला भडका त्यामुळे घडलेली ही घटना यामुळे लक्षात येते की हे किती ज्वालाग्रही  आहे. काहीच कंपन्यांमध्ये या केमिकलचा वापर केला जातो. याचा तपास सुरू आहे, अशी माहिती यावेळी कन्हैया थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


व्युमो ग्राफिक्स कंपनीत पोलीस पोहचले


हिंजवडीत पेटलेली टेम्पो ट्रॅव्हल्स व्युमो ग्राफिक्स कंपनीची होती, याच कंपनीतून बेंझिन केमिकल चोरून चालक जनार्दन हंबर्डीकर ने गाडी पेटवली. कंपनीतून नेमकं एक लिटर बेंझिन चोरीला गेलं की पाच लिटर याचा तपास सुरुये. टेम्पो ट्रॅव्हल्स पेटविण्यासाठी एक लिटर बेंझिनचे वापरले तर मग उरलेलं बेंझिन कुठं आहे, अन त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? याचा तपास पोलीस करतायेत. सोबतचं किती पगार थकला, याची कागदपत्रे ही ताब्यात घेतली जाणार आहेत.


चालकाला कशाचा आला होता राग?


हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये त्याला कोणत्या गोष्टींचा राग आला होता ते सांगितलं आहे. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली होती. कंपनी व्यवस्थापनाने चालकाता दिवाळीत पगार कापला होता. त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, असं त्याचं म्हणणं होतं. तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नव्हता. या कारणांमुळे चालक जनार्धन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने कट रचला होता. परंतु या घटनेत नाहक ज्या चार जणांचा बळी गेला, त्यांच्यावर चालकाच रागच नव्हताच. ज्यांच्यावर राग होता ते या घटनेमध्ये बचावले आहेत. चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?


दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.