Pune Swine Flu: महाराष्ट्रातील पुणे (Pune) शहरात H1N1 इन्फ्लूएंझा किंवा स्वाइन फ्लूच्या (Swine flu) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुणे शहरात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या ताज्या अहवालानुसार, पुण्यात गेल्या काही दिवसांत 36 मृत्यूंसह 540 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि नागरिक चिंतेत आहेत. मात्र स्वाईन फ्लूबाबत फारशी काळजी करण्याची गरज नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ICMR अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पुण्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ हा केवळ बदलत्या वातावरणामुळे झाली आहे. हा कोविड SARS-CoV-2 संसर्गासारखा टिकणार नाही आणि काही काळानंतर तो बरा होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 2020 आणि 2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1,600 स्वाइन फ्लूची प्रकरणे नोंदली गेली. 2019 मध्ये कोविड साथीच्या आजारापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची 2,287 एकूण रुग्ण होते, ज्यात 246 मृत्यू झाले होते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या सुमारे 2,992 रुग्णांची नोंद झाली असून 147 जणांचा मृत्यू झाला आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणं कोणती? काळजी कशी घेणार?
स्वाईन फ्लूच्या आजारात सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यासारखी काही सामान्य लक्षणे दिसतात. यामुळे घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यांसारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणे टाळणे आणि सण-उत्सवादरम्यान योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे योग्य आहे. H1N1 विषाणूच्या उद्रेकादरम्यान आरोग्य तज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
त्याचबरोबर पुण्यातही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वारंवार पडणारा पाऊस, प्रदूषण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव यामुळे डेंग्यूच्या डासांना वाढीस पोषक वातावरण मिळते. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे पावसाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय कुठेही पाणी साचू देऊ नका, पिताना स्वच्छ किंवा उकळून पाणी प्या असं सांगण्यात आलं आहे.