पुणे: राज्यातील मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडून जवळजवळ एक आठवडा होत आल्यानंतर काल (शनिवारी) खातेवाटप पूर्ण झालं आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप काल(ता. 21 शनिवारी) रात्री जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चांगली दमदार खाती आली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते आले आहे, त्याचा फायदा जिल्ह्यातील 21 इतर आमदारांना होऊ शकतो, तर भाजपने नगरविकास राज्यमंत्रिपद पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे दिलेले आहे.
महायुतीच्या नवीन सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्यातील चार आमदारांचा समावेश आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ या 4 आमदारांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश आहे. खाते वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभाग देण्यात आला आहे, तर आधीच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाकडे असलेलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं आहे. तर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आधीच्या सरकारमध्ये असलेलं उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि संसदीय कामकाज हे दोन्ही विभाग तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आमदार माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पाच विभागांची जबाबदारी देण्यात आली असून, ही सर्व खाती शिवसेना व राष्ट्रवादीकडे आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागाच्या माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण, दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं अल्पसंख्याक विभाग, संजय शिरसाट यांच्याकडे असलेलं सामाजिक न्याय विभाग आणि प्रताप सरनाईक यांच्याकडे असेलेलं वाहतूक विभाग या खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या महत्त्वाच्या खात्यांवर फडणवीसांचे राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून लक्ष असणार असल्याच्या चर्चा आहेत.
जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जबाबदारी
कॅबिनेट
उपमुख्यमंत्री अजित पवार : अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क
आमदार चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
आमदार दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास
खातेवाटप झालं आता पुण्याचं पालकमंत्रिपदी कोणत्या दादाकडे?
मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप त्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे पालकमंत्री पदाकडं लागलं आहे. पुण्याचे पालकमंत्रिपदी कोणत्या दादाची वर्णी लागणार याची चर्चा आहे. महायुतीच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काही वर्ष चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये आल्यानंतर हे पद त्यांच्याकडे गेलं, त्यानंतर चंद्रकांत पाटलांना सोलापुरचे पालकमंत्री पद देण्यात आलं होतं, आता नव्या सरकारमध्ये पालकमंत्रीपद अजित दादांकडेच की भाजप पुन्हा चंद्रकांत दादांच्या ताब्यात जाणार याकडे लक्ष लागले आहे.