बारामती: राज्याच हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्यानंतर काल (शनिवारी) खातेवाटप झालं आहे, त्यानंतर आता सर्व आमदार आपल्या मतदारसंघात परतले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार देखील आपल्या बारामती मतदारसंघात परतले आहेत. आज पहाटेपासून बारामती मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. वेगवेगळ्या कामांचा पाहणी केली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी बारामती तालुक्यातील रुई येथील एका ज्वेलर्सच्या उद्घाटना हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये आचारसंहितेमुळे बरीच कामे पडली आहे, ती पुन्हा सुरू करायची आहेत. काल खाते वाटप झालं आहे. लवकरच सर्वजण कामाला लागतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
3 मार्चला आपला अर्थसंकल्प
मंत्र्यांची संख्या जास्त आहे. राज्य मंत्री फक्त 6 आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक-एक खाते देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली काही जण खुश आहेत तर काही जण नाराज आहेत. उद्या-परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे. 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे, तो आता मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन सादर करायचा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आज इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिले आहेत. थोडा वेळ द्या. वेगवेगळे खाते वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे आहेत. काल अधिवेशन संपलं आणि प्रत्येक आमदार आपापल्या भागांमध्ये गेले आहेत, उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर थोडासा वेळ गेल्यानंतर बाकीचे कामे केली जातील, तुमची कामे करणं आमचं कर्तव्य आहे. लगेच आग्रह धरू नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केलं आहे.
मी माझ्या ऑफिसची पद्धत ही काही प्रमाणात बदलणार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर मी माझ्या ऑफिसची पद्धत ही काही प्रमाणात बदलणार आहे. इथल्या ऑफिसमध्ये जरा जास्तीचे अधिकारी नेमून एक सेक्टर या गरिबांना नीटपणे औषधोपचार देण्यासंदर्भात, सार्वजनिक कामांच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या संदर्भात सेक्टर करून अधिकारी नेमणार आहे. जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत नागरी सत्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे. बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भिगवण चौकात देखील मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर मोठ्या कमानी देखील उभारण्यात आलेल्या आहेत. अजित पवारांचं जंगी स्वागत बारामतीकर करताना दिसत आहेत.
अजित पवारा पुन्हा ॲक्शन मोडमध्ये
अजित पवारांनी आपल्या बारामती मतदारसंघात येताच पुन्हा एकदा सर्व कामांचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. आज पहाटेच त्यांनी त्यांच्या कामाला सुरूवात केली, त्याबाबतची माहिती त्यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर केली आहे."आज पहाटेपासून बारामती मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. प्रथमतः मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. महाविद्यालयातील साधनसामग्री, सोयीसुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या महाविद्यालयात आयुर्वेदिक पध्दतीनं उपचार पध्दतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. दरम्यान, याधीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरू झालं असून तिथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात आता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची भर पडल्यानं वैद्यकीय शिक्षणाचा हब म्हणून बारामतीची ओळख निर्माण होईल, यात शंका नाही. आयुर्वेदिक पध्दतीच्या उपचारांची आवश्यकता भासणाऱ्या सर्व रुग्णांना या महाविद्यालयात अत्याधुनिक सोयीसोविधा पुरवल्या जातील. याबरोबरच रुई येथील शासकीय रुग्णालयाच्या कामाची देखील पाहणी केली. त्याचप्रमाणे श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, मारुती मंदिर आणि कऱ्हा नदी परिसरातील कामांची पाहणी केली. यासह विद्या प्रतिष्ठान येथील एआय सेंटरच्या कामाचा देखील आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कामाबाबतची माहिती जाणून घेतली'', अशी पोस्ट अजित पवारांनी लिहली आहे.