पुणे : सेल्फी काढताना झालेल्या अनेक दुर्घटना ऐकायला मिळतात, मात्र सेल्फीमुळे चोर शोधण्यात पोलिसांना मदत होणार आहे. पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. ही चोरी होतानाचा सेल्फी व्हिडिओ तरुणाच्याच कॅमेरात कैद झाला आहे.

मूळ भीमाशंकरचा रहिवासी असलेला विशाल हनुमंत दगडे सध्या पुण्यातील एका कंपनीत काम करतो. विसर्जनाच्या दिवशी तो मित्रासोबत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीत आला होता. त्यावेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी होती.

मिरवणुकीत विशालच्या मागे असलेली एक व्यक्ती गर्दीचा फायदा घेत त्याच्या गळयातील सोन्याची चेन दाताने तोडून चोरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी विशाल आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढण्यात बिझी होता. प्रचंड गर्दी असल्याने मागचा माणूस काय करत आहे, हे त्याला समजलं नाही.

सेल्फी व्हिडिओमध्ये चोरीची घटना कैद झाली आहे. त्याने याबाबत मध्यरात्री फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांच्या मिरवणुकीत मोबाईल, मौल्यवान वस्तू, पॅनकार्ड, आधारकार्ड हरवल्याच्या तब्बल 1 हजार 720 ऑनलाईन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

यात सर्वाधिक तक्रारी मोबाईल चोरीच्या असून काही घटना सीसीटीव्हीत कैदही झाल्या आहेत. विसर्जन काळात पुणे पोलिसांनी शहरात 10 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही या चोऱ्या झाल्यानं लोकांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडिओ :