पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाला बुधवारी सुरुवात होत असून, पुण्यात दरवर्षीप्रमाणे उत्साहाचे वातावरण आहे. गणेश प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर भक्त आणि मंडळांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सोय सुरळीत ठेवण्यासाठी २५ ते २७ ऑगस्टदरम्यान काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये डेंगळे पूल, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. वाहतुकीचे हे बदल तात्पुरते असणार असून, पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
गणेश प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदी निमित्त पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागातील मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे. बुधवारी शिवाजी रोड वरील गाडगीळ पुतळा चौक ते गोतीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज तसेच आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, मोती चौक त्याच बरोबर मंगला टॉकीज समोरील रस्ता या ठिकाणी जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पीएमपी बससाठी सुद्धा पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
शिवाजीनगर बसस्थानकावरून शिवाजीरस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता व टिळक रस्त्याने स्वारगेटला जातील. मनपा बसस्थानकावरून स्वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने स्वारगेटला जातील.
पुणेकरांसाठी पर्यायी रस्त्यांचा मार्ग खुला
- शिवाजी रोडवर गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीस बंद असेल
- वाहनांना संताजी घोरपडे पथावरून, कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे वळविण्यात येईल
- झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पुल मार्गे कुंभारवाडयाकडे जाणाऱ्या वाहनांनी शिवाजीपुल मार्गे जावे
- सिंहगड रस्त्यावर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गांवर रस्त्यालगत पार्किंग करण्यास मनाई असून पार्किंग व्यवस्था मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम ब्रीज येथे असेल
पीएमपी बससाठी हा असेल मार्ग
शिवाजीनगर बसस्थानकावरून शिवाजीरस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता व टिळक रस्त्याने स्वारगेटला जातील. मनपा बसस्थानकावरून स्वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने स्वारगेटला जातील.
या ठिकाणी असेल पार्किंगची व्यवस्था
गणेशमूर्ती खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांना विविध ठिकाणी वाहने पार्क करता येतील.
– कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा
– संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा
– टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता
– मंडई येथील मिनव्हा, आयर्न पार्किंग तळ
– शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक